नगाव येथील मल्हार बाग येथे अनिल गोटे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार गोटे म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात दहशत मुक्त अभियानाच्या माध्यमातून १३४ गावांमध्ये सभा घेतली. त्यापैकी ११३ गावातील नागरिकांनी आमदार जयकुमार रावल यांच्याविषयी तक्रारी ऐकायला मिळाल्यात. ज्या गावातील तरुणांवर अन्याय झाला अशा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणार आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यातील काही पोलिसांना हातीशी धरून ज्येष्ठ व वयोवृध्द डाॅ. हेमंत देशमुख यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यांना पाच महिने तुरुंगवास भोगावा लागला. ॲड. एकनाथ भावसार यांच्यासह गिरधारीलाल रामराख्यासारखे व्यक्तींवर अवैध व्यवसाय करीत असल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल करून त्यांनाही १४ महिने तुरुंगात काढावे लागले. गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिवाच्या पथकाने दोंडाईचा घरकूल योजनेची सखोल चाैकशी केली. यात कोणताही भ्रष्टाचार नसल्याचा अहवाल राज्यशासनाकडे सादर केला. तरीही डाॅ.देशमुखांवर भ्रष्टाराचाराचा गुन्हा दाखल झाला, ही वस्तुस्थिती आहे. असे असतानाही पोलिसांविषयी बाेलू नये का? त्यांचा सत्कार करावा का? असाही सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केला आहे.
पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे
बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढत गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.