धुळे : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तब्बल ५० रुपये केले होते; मात्र आता पुन्हा हे दर कमी करून १० रुपये प्लॅटफॉर्म तिकीट केलेले आहे. त्यामुळे नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांसोबत त्यांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी होत असते. कोरोनाकाळात स्थानकावर होणारी गर्दी टाळावी यासाठी हे तिकीटदर ५० रुपये केले होते. त्यामुळे अनेकजण रेल्वेस्थानकावर येईनासे झाले होते; मात्र रेल्वेने प्लॅटफॉर्मचे तिकीट पूर्ववत केल्याने दिलासा मिळाला.
वर्षभर बसत होता आर्थिक भुर्दंड
पश्चिम रेल्वे मार्गावरील दोंडाईचा, शिंदखेडा ही त्या मानाने लहान रेल्वे स्थानके आहेत. या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र कोरोना काळात जे लोक प्लॅटफॉर्म तिकीट काढत होते, त्यांना मोठा भुर्दंड बसत होता. आता हे दर कमी केल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटाला प्रतिसाद कमी
धुळे जिल्ह्यात नरडाणा, दोंडाईचा व शिंदखेडा ही तीन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.
दोंडाईचा, शिंदखेड्यालाच काही जलद गाड्या थांबत असतात. नरडाण्याला एकही जलद गाडी थांबत नाही
दोंडाईचा, शिंदखेडा येथे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट कोणी काढत नाही. दिवसभरात दोन-तीन जणच प्लॅटफॉर्म तिकीट काढत असतात.
सुरू असलेल्या रेल्वे
सुरत-वाराणसी एक्स्प्रेस
चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
उधना-अमरावती पॅसेंजर
सुरत-भुसावळ पॅसेंजर
सुरत-भागलपूर एक्स्प्रेस
तपासणी करण्याची आवश्यकता
लहान रेल्वे स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे सर्वच स्थानकावर तिकीट तपासनीसांची संख्या वाढविण्याची गरज आहे.