धुळे : दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेला गोड बोलून गंडविले़ तिच्याकडे असलेले सुमारे दोन तोळ्याचे दागिने घेऊन पळून जाण्यात चोरटे यशस्वी झाले़ ही घटना जिजाई कॉलनीत शनिवारी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर कॉलनीवासिय एकवटले होते़ परिसरात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले़ पण, चोरटे हाती लागले नाही़ शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील म्हाडा वसाहतीजवळ जिजाई कॉलनी आहे़ या कॉलनीतील प्लॉट नंबर ३४ मध्ये मिनाक्षी शंकर विभुते यांचे घर आहे़ सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन जणं दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने फिरत होते़ त्यांनी विभुते यांचे घर गाठले़ मिनाक्षी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली़ तुमच्या समोर आम्ही दागिने पॉलीश करुन देतो अशी बतावणी केली़ असे सांगत मिनाक्षी यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला़ घरबसल्या ते ही अल्पदरात दागिने पॉलिश करुन मिळणार असल्यामुळे या महिलेने त्यां भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याकडील सुमारे दोन तोळे वजनाचे दागिने त्यांच्या स्वाधीन केले़ बोलत असताना त्यांनी एक भांडे आणण्यास सांगितले़ असता या दोघांनी दागिने लांबविले़ देवपुरातील नकाणे रोडवरील उन्नती नगरात सुध्दा अशा प्रकारची घटना घडली होती़ येथे देखील महिलेचा विश्वास संपादन करुन पॉलीश करुन देण्याचा बहाणा चोरट्यांनी केला़ त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा केला होता़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ त्यांचा देखील शोध लागलेला नाही़ त्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्यामुळे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे़ कॉलनीवासियांची यानिमित्ताने ‘एकी’!दोन भामटे कॉलनीत फिरत असल्याचे काहींनी पाहिले़ पण, ते असा काही पराक्रम करतील असे कोणाला वाटले नाही़ दागिने घेऊन दोघांनी पोबारा केल्यानंतर महिलेने आरडाओरड केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले़ घटनेनंतर कॉलनीवासिय एकवटले आणि त्यांनी त्या भामट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली़ पण ते मिळून आले नाही़
पॉलिशचा बहाणा करुन लांबविले २ तोळे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:58 IST