लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवरायांच्या कर्तुत्ववान चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाला पावित्र्याची झालर होती़ स्वराज्यात सर्वधर्मियांचा समान वाटा होता़ मनुष्याला केंद्रबिंदू मानून मानवता धर्माचे पालन करणारे राजे शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभावाचे आदर्श प्रतिक होते़ स्वधर्माचे आचरण करुन अन्य धर्मियांचा आदर करणारे होते़ प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्यांच्या पदरी होता़ आरमार आणि तोपखान्याचे प्रमुख मुस्लीम सरदार होते, असे प्रतिपादन प्राचार्य बी़ बी़ महाजन यांनी सर्वधर्मिय नागरीकांच्या अभिवादन सभेत अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना केले़सर्वधर्म संघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात ‘प्रजावत्सल छत्रपती शिवाजी राजे माझ्या दृष्टीकोनातून’ या विषयावर रविवारी सकाळी जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले़ अध्यक्षस्थानी प्राचार्य महाजन होते़ यावेळी प्राचार्य व्ही़ के़ भदाणे, अॅड़ एम़ एस़ पाटील, हाजी करीम न्हावकर, शाहीर शंकर पवार, डॉ़ क़ ऊ़ संघवी, प्रा़ गिरासे, भास्कर अमृतसागर, डॉ़ शरद वाणी, मुहम्मद जैद, कपूर पेन्टर, के़ सी़ हाश्मी, रामनाथ जाधव, अब्दुर्रऊफ शेख, माधव पाटील, डॉ़ विजयचंद्र जाधव, ए़ ओ़ पाटील, एम़ ए़ शेख, गजानन खैरनार, अय्यूब खान आदी उपस्थित होते़साहित्यिक आप्पा करंदे यांच्या प्रबोधनपर मार्गदर्शनाने परिसंवादाला सुरूवात झाली़ शिवकालीन राजमुद्रेचे वाचन करुन कुळवाडीभूषण शिवरायांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, स्वराज्य हे रयतेचे कल्याणकारी राज्य होते़ मराठा ही संज्ञा अठरा पगड जातींसाठी आहे़ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पोवाड्याचा संदर्भ देत करंदे पुढे म्हणाले, शिवछत्रपतींनी सामाजिक विषमतेचे रणशिंंग फुकले होते़ जैनुल आबेदीन शेख यांनीही शिवरांयाच्या पुरोगामीत्वाचे दाखले दिले़अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष शाहीर श्रावण वाणी यांनी गायीलेल्या पोवाड्याने परिसंवादाचा शुभारंभ झाला़ सूत्रसंचालन शेख हुसैन गुरुजी यांनी केले.तर श्रीकृष्ण बेडसे यांनी आभार मानले़ कवी गुलाबराव मोरे यांच्या काव्य वाचनाने कार्यक्रमाचा समारोप झाला़
शिवाजी महाराज सर्वधर्र्मियांचे राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:59 IST