साक्री तालुक्यातील ऐचाळे गावात कपाटाची चावी बनवून देणारे दोन कारागीर आले होते. टेलरिंगचा व्यवसाय करणारे दगा विठ्ठल मराठे (५८) यांच्या घराजवळ ते आले असता कुटुंबातील व्यक्तीने कपाटाची चावी बनवून देण्याचे काम त्यांना दिले. त्यानुसार दोघा ठगांनी घरात प्रवेश करीत कपाटाजवळ जाऊन वाची बनवून देण्याचे काम सुरू केले. त्यांच्याकडे असलेल्या चावीला कपाटाच्या चावीचा आकार देता यावा म्हणून चावी गरम करून आणण्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत असलेला संबंधित व्यक्ती चावी गरम करण्यासाठी किचनमध्ये गेला. यावेळी खोलीत कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत दोघांनी कपाटातील ६० हजार रुपये रोख आणि २६ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या असा एकूण ८० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरला. त्यानंतर वाची बनवून दोघे कारागीर घरातून निघून गेले; परंतु चोरी झाल्याचे घरात कुणालाही कळले नाही. दोन दिवसांनंतर कपाटातील रकमेची तपासणी केली असता त्यात रोडक आणि दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे चावी बनविणाऱ्यांनी चोरी केली असावी, असे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार निजामपूर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी ६.१९ वाजता भादंवि कलम ३८०,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक एस. डी. ठाकरे करीत आहेत.
घरात सर्वजण असताना चावी बनविणाऱ्यांनी टेलरच्या घरात अतिशय सराईतपणे चोरी केल्याने चोरट्यांनी टेलरच्या घरात डोळ्यांचे झापड शिवल्याची चर्चा सुरू आहे.