धुळे : दिवाळीची सुटी संपल्यावर जम्मू येथे कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी निघालेला जवान इच्छितस्थळी पोहचला नसल्याची बाब समोर आली आहे़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली़ परिणामी त्याची शोधाशोध सुरु झाली आहे़ साक्री रोडवरील श्रीहरी कॉलनीत प्लॉट नंबर ८७ मध्ये राहणारा उमेश भिका सामुद्रे (२०) हा सैन्य दलातील जवान दिवाळीच्या सुटीनिमित्त धुळ्यात आला होता़ ४ नोव्हेंबरला त्याच्या सुटीचा कालावधी संपणार होता़ त्यामुळे तो २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धुळ्यातील बसस्थानकावरुन जळगाव येथे रवाना झाला़ जळगावहून रेल्वेने दिल्लीला पोहचल्यावर त्याने आई विजयाबाई सामुद्रे यांना फोनवरुन कळविले होते़ परंतु तो कर्तव्यावर हजर झाला नसल्याचे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील आर्मी येथील कार्यालयातून कळविण्यात आले़ त्यानंतर उमेशचे वडील भिका महादू सामुद्रे यांनी उमेशच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही़ तसेच त्यांनी नातेवाईकांकडेही तपास केला़ मात्र, उमेशबाबत माहिती मिळाली नाही, अशी माहिती भिका सामुद्रे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ त्यावरुन उमेश सामुद्रे हा बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ सहायक पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ बागुल घटनेचा तपास करीत आहेत़
जम्मूसाठी निघालेला जवान पोहचलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:58 IST