लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील दोन रेशन दुकाने २२ जुलै रोजी तहसीलदार किशोर कदम व पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी सील केली होती. या कारवाईत दोन्ही दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी या सीलबंद दोन्ही दुकानांची तहसीलदार किशोर कदम यांच्या पथकाने तपासणी केली. यात दोन्ही दुकानांचा ताबा दुसºया दुकानंदारांकडे देण्यात आला.कापडणे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदार किशोर कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्या पथकाने २२ रोजी गावातील रेशन दुकानांची तपासणी केली होती. यावेळी दुकान क्रमांक ४५ व १८८ बंद आढळून आले होते. दरम्यान, सबंधित अधिकाऱ्यांनी या दुकान मालकांशी वारंवार संपर्क फोनवर साधूनही दुकानदार हजर न झाल्याने दोन्ही दुकाने सिल करण्यात आली होती. अखेर २३ जुलै रोजी सबंधित सील करण्यात आलेली दोन्ही दुकाने निलंबित करण्यात आली.दुकान क्रमांक ४५ व १८८ या दोन्ही दुकानांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २४ जुलै रोजी धुळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम, पुरवठा निरीक्षक हर्षा महाजन, सोनगिरचे मंडळ अधिकारी आर.बी. राजपूत, कापडणे तलाठी विजय पी. बेहरे, देवभाने येथील तलाठी चंदेल आदींचे पथक कापडणे येथे दोन्ही दुकानांची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. दुकान क्रमांक ४५ व १८८ या स्वस्त धान्य दुकानांमधील धान्यसाठा तपासण्यात आला. यावेळी दोन्ही रेशन दुकानांवर हजारो किलो गहू, तांदूळ आढळून आला. तर दुकान क्रमांक १८८ मध्ये साखरेचे पोतेही आढळून आले.यावेळी दुकान क्रमांक १८८ चे मालक रजूबाई देविदास पाटील यांच्या दुकानाचा ताबा मनोहर सुखदेव माळी या रेशन दुकानदाराकडे देण्यात आला. तर दुकान क्रमांक ४५ चे मालक कल्पना प्रमोद बाविस्कर यांच्या दुकानाचा ताबा विलास हिंमत पाटील या दुकानदाराकडे देण्यात आला आहे.
सील केलेल्या दोन्ही रेशन दुकानाच्या साठ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:26 IST