धुळे : गेल्या दीड वर्षापासून कोरोना पाठ सोडायला तयार नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. या संकटाचा फटका विद्यार्थ्यांच्या जंतनाशक गोळ्या वाटप माेहिमेलाही बसलेला आहे. दरम्यान, लहान बालकांमध्ये जंतदोषाचे प्रमाण बऱ्यापैकी बळावलेले आहे. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे आता गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.
उघड्यावर शौचास जाणे, हात स्वच्छ न धुणे आदी कारणांमुळे बालकांमध्ये जंतदोषाचे प्रमाण आढळून येत असते. यावर वेळीच उपचार न झाल्यास, पुढे रक्तक्षय, अपचन, संडास, उलटीचा त्रास होत असतो. परिणामी मुलांची एकाग्रता कमी होत असते. त्यामुळे हा आजारच होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने शाळा, तसेच अंगणवाडीतील बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी ही मोहीम राबविली जाते; मात्र कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्याच बंद असल्याने, वर्षभरापासून ही मोहीम थंडावलेली आहे.
काय आहे जंतदोष?
अतिगोड पदार्थ खाल्याने, पोटात जंत वाढतात. पुढे ते रक्त शोषतात. रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने, मुलांमध्ये ॲनिमिया वाढत जातो. त्यामुळे मुलांमध्ये जंतदोष आढळल्यास वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
वयाच्या १९व्या वर्षापर्यंत द्यावा लागतात गोळ्या
जंताचा प्रादुर्भाव वयाच्या दोन वर्षांवरील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो. वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंत याचा त्रास होत असतो. त्यासाठी डॅाक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असते.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधावा?
एकही बालक गोळ्यांपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोळ्यांसाठी पालकांनी, नातेवाईकांनी गावातील शाळेतील शिक्षक, अंगणवाडीसेविका यांच्याशीच संपर्क साधावा.
जंतदोष कमी-अधिक प्रमाणात असतो. जिल्ह्यात २१ सप्टेंबरपासून ५ लाख ३६ हजार बालकांना गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.
- डॉ. संतोष नवले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे
आरोग्य विभागामार्फत केले जाते वाटप
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविली जाते. त्यासाठी दरवर्षी गोळ्या वाटप केल्या जातात. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी ग्रामीण भागात जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात.