लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : मालमत्ता करासंदर्भात हरकत घेतलेल्या कर दात्यांची गुरुवारी मालमत्ता कर अपिलीय समितीसमोर सुनावणी झाली. यावेळी ३ हजार करदात्यांच्या उपस्थितीमुळे नगरपालिकेला यात्रेचे स्वरुप आले होते. यावेळी नागरिकांनी मालमत्ता करात कमीत कमी वाढ करण्याची मागणी समितीसमोर मांडली.शासन नियमाप्रमाणे दोंडाईचा नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी, वाढीव कर आकारणी केली होती. सदर कर आकारणी ३० टक्के वाढीने केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्या वाढीव कर आकारणीवर दोंडाईचा शहरातील कर दात्यांनी हरकती घेतल्या होत्या. यावर प्रथम २८ नोव्हेंबर २०१९ रोजी अपिलीय समितीसमोर सुनावणी झाली होती. परंतू यावर करदात्यांचे व नगरपालिकेचेही समाधान झाले नाही.आकारलेला कर अवास्तव असल्याने नगरपालिकेने तो कर कमी करण्यासाठी ठराव संमत केला. त्यानंतर पुन्हा ३ हजार मालमत्ता धारकांनी हरकती घेतल्या. मालमत्ता धारकांच्या हरकतींवर म्हणणे ऐकून घेण्यासाठी अपिलीय समिती गठीत करण्यात आली होती.शासनाचा नियमाप्रमाणे आकारलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीवर हरकत घेतलेल्या मालमत्ता धारकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नेमलेल्या अपिलीय समितीसमोर ३ हजार मालमत्ता धारकांनी आपले म्हणणे सादर केले.शिरपूर प्रांताधिकारी विक्रम बांदल अध्यक्ष असलेल्या अपिलीय समितीत नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, बालकल्याण सभापती प्रियंका भरतारी ठाकूर, विरोधी पक्षनेते मनीषा भिल आदी उपस्थित होत्या.समितीला मुख्याधिकारी डॉ.दीपक सावंत, स्वीय सहाय्यक नरेंद्र राजपूत, मालमत्ता विभागाचे सलिम शेख, अभियंता शिवनंदन राजपूत, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले. दोंडाईचा शहरातील वाढीव मालमत्ता करावर हरकती घेतलेल्या मालमत्ता धारकांची सुनावणी नगरपालिकेच्या कार्यालयात झाली. यासाठी सात झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. अपिलीय समितीने नागरिकांच्या हरकती ऐकून घेऊन त्याची नोंद केली. दरम्यान, एकाच दिवशी सुमारे ३ हजार करदात्यांना सुनावणीसाठी बोलविल्याने नगरपालिकेस यात्रेचे स्वरूप आले होते.
मालमत्ता कर कमीत कमी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:27 IST