कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालकांना हिरावून अनेक बालकांना पोरके केले आहे. पालक गेल्यामुळे या बालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काही बालकांना निवाऱ्याची गरज भासते आहे. तर काहींना मालमत्तेचा हक्क हवा आहे. त्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. सुरुवातीला जिल्हा स्तरावर कृती दल नेमण्यात आले होते. त्यानंतर तालुका स्तरावरही कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. त्या माध्यमातून आईवडिलांना गमावलेल्या बालकांचा शोध घेता आला आहे. अनाथ झालेल्या बालकांना ठोस मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. आई व वडील दोन्ही गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपयांची मदत टाकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना ती रक्कम वापरता येणार आहे. तसेच काही बालकांना मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांच्या मदतीसाठी बालकल्याण समिती पुढे सरसावली आहे. त्यांच्याकडून बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
१४ जणांचे आईवडिलांचे छत्र हरवले
- कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जिल्ह्यातील १४ बालकांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरवले आहे. आईवडील दोघांना गमावल्यामुळे या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
- बालकांच्या मदतीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा कृती दल व तालुकास्तरावर स्थापन झालेल्या कृती दलाच्या माध्यमातून पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.
- बालकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण व बालकल्याण समितीचे सदस्य मेहनत घेत आहेत.
१ - चारही भावंड झाले अनाथ -
आई - व वडील दोन्ही कोरोनामुळे वारल्याने चार भावंड अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. या मुलांचे पालक पुणे येथे वाॅचमनची नोकरी करत होते. मात्र घरातील कर्ती माणसं गेल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यातच आईवडिलांचे छत्र हिरावले गेल्याने बालक पूर्णपणे कोसळले आहेत. तालुका कृती दलाने त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे तालुका कृती दलाच्या सदस्य मीना भोसले यांनी सांगितले. आईवडील गमावलेल्या बालकांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यासाठी गावकरी व नातेवाइकांनी पुढे येणे गरजेचे आहे. पालक गमावलेल्या अनेक बालकांची माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या परिचयातील कुणाचे पालक कोरोनाने वारले असतील तर अशा बालकांची माहिती शासकीय यंत्रणेकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनीदेखील या कामासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
२ - बहीण करतेय सांभाळ
आई व वडील गमावल्याने तीन भावंडे अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. १७ वर्षांची मोठी बहीण आपल्या १२ वर्षीय भाऊ व ८ वर्षीय बहिणीचा सांभाळ करत आहे. आईवडील गेल्याने १७ वर्षीय मुलगी मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करत आहे. घरातील कमावती व्यक्ती कोरोनामुळे वारल्याने लहान मुलांवर मजूर करण्याची वेळ आली आहे. तालुका कृती दलाने या कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या बाबतीतील संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. गरिबीची परिस्थिती असल्याने संपूर्ण कुटुंब निराधार झाले आहे. शासनाच्या नियमानुसार कुटुंबाला मदत करण्यात येईल त्यासोबतच इतर योजनांच्या माध्यमातूनही त्यांना लाभ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले असल्याची माहिती तालुका कृती दलाच्या सदस्यांनी दिली. पोरके झालेल्या बालकांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. गावकऱ्यांनी पुढे येऊन बालकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.
३ - बालके आणि ७३ वर्षाचे आजोबा
१० वर्षाच्या आतील दोन भावंडं आई व वडिलांच्या निधनाने अनाथ झाली आहेत. वडिलांचे आधीच निधन झाले होते. त्यात कोरोनाने आईलाही हिरावून नेले. त्यामुळे लहानग्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कुटुंबात केवळ ७३ वर्षाचे आजोबा आहेत. आजोबा त्यांचा सांभाळ करीत आहेत. या बालकांना निवाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासोबतच त्यांना इतर योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या स्तरावरून अनाथ झालेल्या बालकांना मदत दिली जाणार आहे. मात्र या बालकांना मानसिक आधार देण्यासाठी समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भूमिका समाजाने घेतली तर या बालकांना कठीण प्रसंगातून जाताना बळ मिळू शकते. तसेच त्यांच्या नातेवाइकांनीही आस्थेवाईकपणे विचारपूस केली तर त्यांच्यातील पोरकेपणाची भावना कमी होऊ शकते.