दर दिवशी हनुमानाची पूजा तर होतेच, मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष सोहळा असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हनुमान जयंतीचा उत्सवही अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असतो. मात्र, उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यायामशाळा व तेथील कार्यक्रमांचा थोडक्यात घेतलेला आढावा...
बाळगोपाळ व्यायामशाळा
शहरातील बाळगोपाळ व्यायामशाळेची स्थापना ॲागस्ट १९५२ मध्ये झालेली आहे. या व्यायामशाळेच्या संस्थापक मंडळात (कै.) माजी आमदार भगवतीप्रसाद रामभरोस पांडे, भटू कौतिक माळी, स्वातंत्र्यसैनिक महादू मोतीराम चौधरी, पहेलवान पांडुरंग डोंगर पाटील, दामू एकोबा मराठे, मुरलीधर श्रीधरशेठ बडगुजर, शेनफडू बारकू माळी, राजाराम शामजी माळी, रामभाऊ चिलवंते, नामदेव एकोबा मराठे यांचा समावेश होता. सध्या रामभाऊ सोनवणे हे व्यायामशाळेचे अध्यक्ष आहेत. या व्यायामशाळेतही मारुतीची सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मूर्तीला शेंदूर लावण्यात आलेला असून, मुकुट व हार घातलेला आहे. मूर्तीजवळ शंखही ठेवण्यात आलेला आहे.
या ठिकाणीही दरवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असते.
आदर्श विजय व्यायामशाळा
जुन्या धुळ्यातील आदर्श विजय व्यायामशाळा ही बिस्मिल्ला उस्ताद नावाने होती. तिची स्थापना १८९५ मध्ये झालेली आहे. त्यानंतर १९९५ मध्ये या व्यायामशाळेचे आदर्श विजय व्यायामशाळा असे नामकरण करण्यात आलेले आहे. या ठिकाणीही बजरंगबलीची मूर्ती स्थापन केलेली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी येथेही सूर्योदयापूर्वी अभिषेक केला जातो. त्यानंतर आरती केली जाते. दुपारी १२ व नंतर सायंकाळी ७ वाजताही आरती करण्यात येते. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येते. हनुमान जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जात असते.
दिगंबर विजय व्यायामशाळा
धुळे शहरातील गल्ली नंबर पाचमध्ये माधवपुरा भागात दिगंबर विजय व्यायामशाळा आहे. ही व्यायामशाळा सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वीची आहे. या व्यायामशाळेच्या स्थापनेत बाबूराव नारायण वाघ, बाबूराव होरनाळ, तमन्ना कापसे, भिकाजी सूर्यवंशी यांचा वाटा आहे. येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होत होती. मात्र, आता कालांतराने ती प्रथा बंद पडली. येथे हनुमान जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाते. व्यायामशाळेत सुमारे अडीच फुटांची रेखीव हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पूजाअर्जा होते. त्यानंतर आरती होते. पूर्वी सायंकाळी वाजतगाजत जाऊन
खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवीला साडी-चोळीचा आहेर दिला जायचा. मात्र, आता मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच देवीला आहेर अर्पण केला जातो. आहेर अर्पण करण्याची प्रथेत खंड पडू दिलेला नाही.
गवळी पंच बिस्मिल्ला
विजय व्यायामशाळा
गवळीवाड्यात असलेल्या या व्यायामशाळेची स्थापना १९३७-३८ मध्ये झाली. १९८४-८५ मध्ये व्यायामशाळेचे सुशोभीकरण झाले. त्यानंतर व्यायामशाळेत हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. कै. कोंडिबा वस्ताद घुगरे (गवळी) व तत्कालीन नगराध्यक्ष कै. अर्जुन काकाेबा गवळी यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. व्यायामशाळेत हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. अभिषेक, पूजा झाल्यानंतर याच दिवशी भंडाराही केला जातो. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अतिशय साध्यापद्धतीने हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी मूर्तीसह व्यायामशाळेतील सर्व साहित्याची पूजा करण्यात येते. त्यानंतर प्रसाद वाटप केला जातो.
कोंडाजी विजय व्यायामशाळा
दत्तभक्त बालगोपाल मित्रमंडळाची गल्ली नंबर ६ मध्ये शिवाजीपुरा भागात कोंडाजी विजय व्यायामशाळा आहे. ही व्यायामशाळा १०० ते १२५ वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. व्यायामशाळेच्या जुन्या इमारतीत ट्रस्टचे सभासद सबाजीराव कालेवार, हरीदादा सातपुते, किसन गवळी, हरी चौधरी, पंडीत भरस्कार, दगडू काळे, रघुनाथ काळे, भिला पहेलवान यांच्याहस्ते मूर्तीची स्थापना झाली. नंतर हीच परंपरा घेऊन व्यायामशाळेचे अध्यक्ष भगवान कालेवार, व इतरांनी ही मूर्ती नवीन जागेत स्थापन केली. व्यायामशाळेचे सर्व सदस्य रात्रभर जागून मंदिर सजवतात. प्रसादाची तयारी करतात. सकाळी ५ वाजता मूर्तीचा पंचामृताने अभिषेक होतो.हनुमान चालिसाचे पठण होते, सामूहिक आरती होत असते. हनुमान जयंतीनिमित्ताने व्यायामशाळेवर रोषणाई करण्यात येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे.
भांग्या मारुती मंदिर
शहरातील सहाव्या गल्लीत भांग्या मारुती विजय व्यायामशाळा आहे. सुमारे १२० वर्षांपूर्वी येथे भांग्या मारुतीचे छोटेचे मंदिर होते. त्यानंतर स्व. रामभाऊ सोनुजी करनकाळ (रामा पहेलवान) हे या व्यायामशाळेचे संस्थापक आहेत. श्रमदानातून ही व्यायामशाळा बांधण्यात आली. मूर्तीही प्राचीनच आहे. दरवर्षी हनुमानचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. शेंदूर लेपन, अभिषेक, आरती असे कार्यक्रम हाेतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यायामशाळेच्या मोजक्या लोकाच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल, अशी माहिती माजी महापौर भगवान करनकाळ यांनी दिली.