धुळे : भरड धान्यासह कडधान्याला शासनाने हमीभाव दिला खरा; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेले धान्य खरेदी करण्यास शासनाने नकार दिल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. धान्याचा दर्जा ठरविल्याने हमीभाव केवळ कागदावरच राहिला. मूग, उडीद आणि सोयाबीनला शासनाने अनुक्रमे ७ हजार, ६ हजार आणि ३८०० रुपयांचा भाव दिला होता. त्या तुलनेत मूग आणि उडिदाला ८ हजार तर सोयाबीनला ४ हजारापेक्षा अधिक बाजारभाव होता; परंतु अतिवृष्टीमुळे पिकांना पाणी लागल्याने धान्य खराब झाले होते. असे असताना एफएक्यू दर्जाचे अर्थात केवळ उच्च प्रतीचे धान्य हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या धान्याची खरेदी शासनाने केली नाही. खराब झालेले धान्य शेतकऱ्यांना बाजारात कवडीमोल भावात विकावे लागले. त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. सोयाबीनला बाजारात जास्त भाव होता. शासनाने हमीभाव कमी दिला होता.दरम्यान, ज्वारी, बाजरी आणि मका खरेदी सध्या सुरू आहे. अनुक्रमे २६२० रुपये, २१०० रुपये आणि १८५० रुपये हमीभाव दिला आहे. बाजारभावापेक्षा अधिक हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला. धुळे तालुक्यात ८०० क्विंटल ज्वारी, ६५० क्विंटल बाजरी आणि ६ हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. शिरपूर तालुक्यात २३६२ क्विंटल मका खरेदी झाला आहे. ज्वारी आणि बाजरीची खरेदी बाकी आहे. नोंदणी मात्र झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ६ हजार ५४३ क्विंटल मका, १३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. बाजरीसाठी २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्याची खरेदी अजून व्हायची आहे. शासनातर्फे हमीभावाने खरेदी सुरू असली तरी ज्वारी, बाजरी आणि मक्याचादेखील दर्जा शासनाने ठरवला आहे. पाणी लागलेले धान्य शासनाने नाकारल्याने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पावसामुळे कापूस पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात कापूस हाती आला; परंतु सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने उशीर केला. त्याआधी खासगी व्यापाऱ्यांनी साडेपाच हजाराच्या भावाने कापूस खरेदी सुरू केली होती; परंतु व्यापारी काटा मारुन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वाईट अनुभव येतो. ज्यावेळी शेतकरी कांदा विक्रीसाठी जातो त्यावेळी त्यांचा कांदा कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करतात. त्यानंतर साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत तोच कांदा ५० ते १०० रुपये किलो दराने विकला जातो. सध्या किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपये किलो भाव आहे; परंतु बाजार समितीमध्ये मात्र सोमवारी वसमार येथील शेतकऱ्याचा कांदा २१ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेला शेतीमाल शासनाने नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:52 IST