धुळे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व वित्तहानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा दिल्या असून, पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला असल्याचेही आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असून, नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. आमदार कुणाल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विंचूर, शिरुड, बोरकुंड परिसरातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण धुळे तालुक्यासह शिरूड, बोरकुंड, बोरी परिसरात अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतांमध्ये पाणी साचून कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कडधान्य, आदी खरीप पिके सडू लागलेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत शिरुड, बोरकुंड आणि बोरी परिसरात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आमदारांनी धीर दिला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी, रहिवासी पंचनामा करण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महाविकास आघाडी शासनाने पंचनाम्याचा सविस्तर तपशील मागविला असून, सर्व नुकसानग्रस्तांना पूर्णपणे नुकसानीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. नुकसानीच्या पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी पं. स. सभापती बाजीराव पाटील, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, बाजार समितीचे प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, संचालक बापू खैरनार, विंचूर येथील ज्येष्ठ नेते शिवाजी बोरसे, जनार्दन देसले, रतनपुरा सरपंच पोपटराव माळी, भैया पटेल, शिरूडचे माजी उपसरपंच आबा शिंदे, एकनाथ देवरे, राजू पवार, रमेश शिंदे,ॲड. बी. डी. पाटील, आबा पाटील, अशोक बोरसे, भाऊसाहेब देसले, सुभाष बोरसे, दगडू माळी, पप्पू भदाणे, दशरथ बोरसे, सुनील चौधरी, प्रभाकर माळी,विलास पाटील यांच्यासह शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.