दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ६ हजार २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ४ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २ हजार ३७५ उमेदवारांनी माघार घेतल्याने, ३ हजार ३१९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहे. अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून, त्यात धुळे ८, शिंदखेडा १५, साक्री ९ व शिरपूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण ५१२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मात्र निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने, निवडणुकीत पाहिजे तसा रंग दिसून आला नाही. फक्त शेवटच्या दोन दिवसांतच काही ठिकाणी रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात आली.
साहित्य वाटप
धुळे तालुक्यात २४४ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत धुळ्यातील शासकीय तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयात मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी केल्यानंतर ईव्हीएम मशीन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. मतदानाचे साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी शिवशाही बस व खाजगी वाहने अधिग्रहित करण्यात आली होती. या वाहनांनीच कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले.