साक्री तालुक्यातील कावठी येथे राहणाऱ्या आशाबाई गुलाब शिवदे ही महिला श्रावण महिन्यानिमित्त संतोषी मातेचा नवस फेडण्यासाठी परिवारातील सदस्यांसह नातलगांसमवेत धुळ्यात आली होती. मंदिराच्या परिसरात जागा नसल्याने कल्याण भवनाजवळ त्यांनी नवस फेडण्याची तयारी केली. नैवेद्य तयार करुन ही महिला परिवारातील अन्य सदस्यांसह संतोषी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गेली होती. यावेळी तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने आशाबाईंच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळे वजनाची सोनपोत लांबविली. गळ्यातील सोनपोत चोरीस गेल्याचे लक्षात येताच आशाबाईने आरडाओरड केली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना कळताच पथकही तातडीने दाखल झाले. शहर पोलिसांच्या शोध पथकातील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते. शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली.
नवस फेडायला आलेल्या महिलेची सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST