धुळे : नंदुरबार येथे गौणखनिज तपासणी करणाऱ्या आदिवासी महिला तलाठी कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ, विनयभंग करीत सरकारी कामात अडथळा आणणारे भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली आहे. या नगरसेवकाने राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नंदुरबार येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, विधानसभा क्षेत्र अध्यक्षा माधुरी पाटील, कार्याध्यक्षा तरुणा पाटील, सचिव रश्मी पवार, सरोज पवार, गणेश धुळेकर, राज देवरे आदींनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी आदिवासी महिला तलाठी व त्यांच्या पथकातील इतर महिला कर्मचारी हे गौणखनिज तपासणी करत असताना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. डंपर चालक डंपर सोडून पसार झाला. अकरा वाजेच्या सुमारास घटनास्थळी डंपर मालक भाजपाचे नगरसेवक गौरव चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तलाठी, कर्मचाऱ्यांशी वाद सुरू केला. दमदाटी करत आदिवासी महिला तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच जमिनीवर ढकलून दिले.
याप्रकरणी भाजप नगरसेवक गणेश चौधरी यांच्यावर विनयभंग, ॲट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी, आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच भाजप नगरसेवक गणेश चौधरी यांचा महिला आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.