धुळे : शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एसटीत मोफत प्रवासाची सुविधा मिळावी आदी मागण्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आल्या. राज्यातील बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील (पढावद) यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेण्यात आली. त्यावेळी वरील मागण्या करण्यात आल्या.शिष्टमंडळाने सांगितले की, राज्यात सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून दिली जाते. मात्र शेतीसाठी केवळ आठ तासच वीजपुरवठा करण्यात येतो. जो पुरवठा होतो, तोदेखील कमी दाबाने होत असतो. शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून दिल्यास विजेचा वापर थोडाफार वाढेल. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व देखभाल खर्च कमी होईल. उत्पादनदेखील वाढेल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगरमध्ये बदल करून शेतकऱ्यांना नुकसानकारक करण्यात आले. जे ट्रिगरकधी येऊन शकत नाही असे ट्रिगर ठेवण्यात आले. हे ट्रिगर विशेषत: केळी व डाळिंब फळपिकांचे जास्त नुकसानकारक आहेत. त्यामुळे २०१९ला जे ट्रिगर होते तेच ट्रिगर कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.राज्यातील इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी बसचा प्रवास मोफत दिला जातो. तशीच सुविधा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनाही देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना टोलमाफी देण्याचीही मागणी केली.दरम्यान, हे निवेदन माझ्या शिफारशीने सरकारला पाठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यपालांना शिष्टमंडळास दिले. तसेच ॲड. प्रकाश पाटील यांनाही आपण कृषीचे पद्मभूषण आहात, असे गौरोद्गार काढले.या शिष्टमंडळात ॲड. प्रकाश पाटील (पढावद), नरेंद्र पाटील (लोणी, ता.चोपडा), हेमंत देशमुख (वाशिम), उत्तमराव ठोंबरे (नाशिक), कृष्णा पवार (औरंगाबाद), अनंता पाटील (हिंगोली), श्रीकांत आखाडे (जालना) यांचा समावेश होता. यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांना २४ तास वीज, मोफत प्रवासाची सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:41 IST