धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या लोखंडी दांड्याचा कट लागल्याने पिकअप व्हॅनमधील १४ वर्षीय मुलगी वाहनाबाहेर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात छबीलाल दहिल्या राऊत (रा. काळंबा, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास एमएच १४ सीपी १९२७ क्रमांकाची पिकअप व्हॅन घेऊन छबीलाल राऊत हा पिंपळनेर ते नवापूर रोडने मळगाव शिवारातून जात होते. समोरुन जीजे ०१ एक्स ०४५५ या क्रमांकाचा ऊसाने भरलेला ट्रक येत होता. या ट्रकने पिकअप वाहनाला कट मारला. त्यामुळे मालट्रकची दांडी पिकअप व्हॅनच्या पाठीमागे लागली. या वाहनात बसलेली निलीमा छगन देसाई (१४, रा. काळंबा पोस्ट वार्सा ता. साक्री) ही बालिका खाली फेकली गेली. त्याचवेळेस त्या बालिकेच्या डोक्याला पिकअप वाहनाचे फलकेही लागले. ती रस्त्यावरच बेशुध्द झाली. तिला तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून बालिकेला मयत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.
ट्रकमधील लोखंडाच्या दांडीचा कट लागल्याने बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:30 IST