धुळे : तांत्रिक पध्दतीचा वापर करून ओटीपी क्रमांक मिळवत तरुणाच्या बँक खात्यातून परस्पर ४२ हजार ४८५ रुपये काढून घेत आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ जानेवारी रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.प्रशांत शिवाजी पाटील (४०, हल्ली मुक्काम शाहूनगर, देवपूर धुळे, मूळ राहणार मंगरुळ, ता. अमळनेर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार एकाने मोबाईल फोन करून तरुणाच्या क्रेडिट कार्डावर लाईफ इन्शुरन्स व सीसीटीव्ही सर्व्हिस बंद करण्याबाबत सांगितले. त्यासाठी फोन करून ओटीपी क्रमांक मिळविण्यात आला. हा प्रकार २० जानेवारी रोजी दुपारी सव्वादोन ते अडीचच्यासुमारास घडला.काही कळायच्या आत स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डावरून ४२ हजार ४८५ रुपये परस्पर वर्ग झाले. तांत्रिक पध्दतीचा अवलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसगत झाल्याचे प्रशांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली.याप्रकरणी २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या नोंदीनंतर पोलिसांनी तपास कामाला सुुरुवात केली आहे़
ओटीपी मिळवत तरुणाला ४२ हजारांत फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 22:24 IST