पिंपळनेर- साक्री तालुक्यातील चिकसे येथे गांगेश्वर रस्त्यालगत असलेल्या गटखळ नदी किनारी मृतावस्थेत अंदाजे पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास काही आदिवासी लहान मुलं बकऱ्या चारण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्या दुरून दिसून आला, यावेळी त्यांनी तेथून पळ काढला व स्थानिक नागरिकांना ही माहिती दिली.अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता सदर बिबट्या हा मृत आढळून आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या भागात नेहमी बिबट्याचा संचार होता. परिसरातील शेतकरी बांधवांचे पशू बिबट्यांनी फस्त केले होते. त्यात शुक्रवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी सदर बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सकाळी नऊ वाजेपासून घडलेल्या या घटनेत दुपारी एक वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नव्हते. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हा बिबट्या मेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
पिंपळनेरजवळ नदी किनाऱ्यावर पाच वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:25 IST