पाईपलाईन टाकून वर्ष उलटले
इंदिरा गार्डन परिसरासह इतरही वसाहतींमध्ये पाईपलाईन टाकून वर्ष उलटले तरी रस्ते त्याच स्थितीत आहेत. पाईप टाकल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे यंदा झालेला बेमोसमी पाऊस आणि मान्सूनच्या पहिल्याच पावसात संपूर्ण देवपूर चिखलाने माखले आहे. वाहने चालविणे आणि पायी चालणेदेखील शक्य नाही. गाड्यांची चाके चिखलात फसत असल्याने नागरिकांच्या गाड्या कंपाऊंडमध्येच पार्क केलेल्या आहेत, अशी परिस्थिती आहे.
काही रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट
भूमिगत गटार योजनेंतर्गत पाईपलाईन टाकलेल्या काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पाईपलाईन टाकताना जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केल्याने संपूर्ण रस्ता खोदला गेला. परंतु डांबरीकरण मात्र रस्त्याच्या मध्यभागी पाईप टाकला तेवढेच केले आहे. शिवाय रस्त्याचे काम करताना खडीकरण मजबूत केलेले नाही, रोलरने दबाई केलेली नाही, डांबराचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे एक दोन पावसातच हे डांबरीकरण वाहून जाणार आहे. आतापासून रस्ते खचू लागले आहेत. धक्कादायक म्हणजे ऐन पावसाळ्यात सुरू केलेले रस्त्यांचे डांबरीकरण कितपत टिकेल याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
वाडीभोकर रस्त्याचे काम सुरू
देवपुरातील अभियंतानगरपासून वाडीभोकर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारपासून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरची माती खोदून बाजूला केली जात आहे. त्यानंतर खडीकरण आणि नंतर रस्त्याचे काम केले जाणार आहे. परंतु ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम हाती घेतल्याने या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांना रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे. हे काम पावसाळ्याच्या आधीच करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यांखाली गेल्याने रहिवासी वैतागले आहेत. व्यावसायिकांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना दुकाने बंद ठेवावी लागली.
पारिजात काॅलनीत गटारीची पाईपलाईन टाकून एक वर्ष झाला. तरीदेखील रस्त्याचे काम केले नाही. त्यामुळे काॅलनीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात वाहने चालविणे देखील कठीण आहे. वाईट अनुभव येत आहेत. - प्रा. विजय देसले, पारिजात काॅलनी.
इंदिरा गार्डन ते जयहिंद शाळेपर्यंतचा रस्ता गेल्या वर्षभरापासून खोदलेला आहे. पाईप टाकले गेले. परंतु आता चेंबरचे काम सुरू केले आहे. यामुळे व्यवसायावरदेखील परिणाम झाला असून आर्थिक नुकसान होत आहे. - विशाल कोतकर, किराणा व्यावसायिक.
दोन वर्षांपासून वाडीभोकर रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चारही महिने चिखल असतो. आता रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्याआधी रस्त्याचे काम झाले पाहिजे होते. - रवींद्र मेटकर, व्यावसायिक.