जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै-ॲागस्ट २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार धुळे तालुक्यातील ७२, शिंदखेडा ६३, साक्री ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. जिल्ह्यातील ७४७ प्रभागातून १९८८ सदस्य निवडीसाठी तब्बल ६ हजार २०८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीपर्यंत २ हजार ३७५ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींसह तब्बल ५१२ सदस्यांची निवड बिनविरोध निवड झाल्याने, १४७६ जागांसाठी ३ हजार ३१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ लाख ७९ हजार ८१३ पैकी २ लाख ९२ हजार १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केलेले आहे. मतदानाची टक्केवारी ७७ टक्के एवढी राहिली. सर्वाधिक मतदान साक्री तालुक्यात ७७.६३ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल धुळे तालुक्यात ७७.१७, शिरपूर ७६.३६ व शिंदखेडा तालुक्यात ७६.३४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानानंतर मतदान यंत्र तालुक्याच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली असून, त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण
दरम्यान शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.साधारणत: साडेदहा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.
कोणाचे वर्चस्व राहणार?
कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका अतिशय सुरळीत पार पडल्या आहेत. माघारीपर्यंत ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, त्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर अनेक पक्षांनी आपला झेंडा फडकल्याचा दावा केलेला आहे. मात्र सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
विशेष म्हणजे धुळे, साक्री, शिंदखेडा, व शिरपूर तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती झालेल्या असून, या गावांच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.