धुळे : मिल परिसरातील शासकीय दूध डेअरीजवळ असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा टाकला. यात अडीच लाखांचे बनावट मद्य जप्त केले असून, संशयिताला अटक करण्यात आली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात बनावट मद्य प्रकरणी याच गुन्ह्यातील आरोपीवर गुन्हा दाखल असून घटनेच्या दिवसांपासून तो फरार होता.१० डिसेंबर रोजी धुळे तालुक्यातील आर्वी गावाच्या शिवारातील हॉटेल चक्रधरजी द्वारका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात देशी मद्य ताब्यात घेण्यात आले. यावेळी संशयित आरोपी विठ्ठल सुका बोरसे याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही दारू विशाल प्रवीण सोनवणे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पथकाने मिल परिसरातील शासकीय दूध डेअरीसमोर राहणाऱ्या विशाल प्रवीण सोनवणे याला चौकशीकामी ताब्यात घेऊन त्याच्या घराची तपासणी करण्यात आली.त्यावेळी ५५० रिकामे खोके, पत्री बुच, स्पिरीटच्या वासाचा रिकामा ड्रम, दारूच्या वासाचे रिकामे ड्रम, पत्री ट्रे यासह वेगवेगळ्या प्रकारचा दारूचा साठा असा एकूण २ लाख ६६ हजार ६९४ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक उषा वर्मा, नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. एस. महाडिक, प्रभारी निरीक्षक बी. आर. नवले, दुय्यम निरीक्षक अमोल पाटील, टी. एस. देशमुख, के. एन. गायकवाड, एस. एस. गोवेकर, आर. एन. सोनार, जे. बी. फुलपगारे, ए. व्ही. भडागे, के. एम. गोसावी, जी. व्ही. पाटील, डी. टी. पावरा, व्ही. बी. नाहीदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास धुळ्याचे निरीक्षक बी. एस. महाडिक करीत आहेत.
मिल परिसरातील सुरु असलेला बनावट दारूचा अड्डा उद्धवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 22:05 IST