भूषण चिंचोरे
धुळे : येथील जुन्या जिल्हा रुग्णालयात लवकरच डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला मायक्रोस्कोप रुग्णालयात दाखल झाला असून त्याची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. महेश भडांगे यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व प्रसूती करण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून नॉन कोविड रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. मात्र, आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून नॉन कोविडच्या रुग्णांचे उपचार सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.
एक सॅम्पल पाठविले -
मायक्रोस्कोपचे एक सॅम्पल तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्या चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तीन सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तिन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे.
दीड महिन्यात १२ शस्त्रक्रिया -
जिल्हा रुग्णालयात मागील दीड महिन्यात कुटुंब नियोजनाच्या १२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर पाच महिलांची प्रसूती झाली आहे. तसेच गरोदर मातांची तपासणी करण्यात येत आहे. गरोदर महिलांनी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भडांगे, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालयात लवकरच डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची तपासणी व प्रसूती करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात दोन ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.
- डॉ. महेश भडांगे, जिल्हा शल्यचिकित्सक