आकर्षक गणरायाची मूर्ती दाखल
शहरातील बाजारपेठेत घरगुतीपासून सार्वजनिक मंडळासाठीच्या आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. गणपती उत्सव काळात गणपती मूर्तीबरोबर पूजा सामुग्रीसह इतर वस्तूंना मागणी अधिक आहे. त्यामुळे कोरोनामध्ये झालेले नुकसान भरुन निघेल अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे. तथापि कच्चा माल आणि रंगाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम हा गणेशमूर्तीच्या किमतीवरही झालेला आहे. सार्वजनिक गणेश मंडळे काटेकारपणे नियमात राहून अतिशय साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करतील. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उत्सव पाहायला मिळणार नाही असे चित्र समोर येत आहे. यंदाच्या वर्षी मंडळाच्या गणेशाचे स्वरुप साधे असणार आहे. मोठ्या मूर्ती या काही मंडळे बाहेरील जिल्ह्यातून आणतात. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या मूर्तींना परवानगी नसणार आहे. त्यामुळे गणेश मंडळ स्थानिक मूर्तीकाराकडून गणपती मूर्ती घेण्यााठी प्राधान्य देत आहे.
पावसाचा असाही परिणाम
कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने शाडू मातीच्या मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. तरीही या मूर्तींना मागणी वाढती आहे. बाजारात नगर, पेण, अमरावती आदी ठिकाणाहून पीओपीच्या गणेश मूर्ती दाखल झालेल्या आहेत. डिझेल, कलर, पीओपी महागल्याने १५ टक्क्याने किमतीत वाढ झाल्याचे शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कृत्रिम फुलांना अधिक मागणी
मागील वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या बाजारपेठेवर कोरोनाचे सावट असले तरी उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. चिनी बनावटीच्या रोषणाई माळा, कृत्रिम फुलांच्या सजावट साहित्याला दरवर्षी बाजारात मोठी मागणी असते. यंदा बाजारपेठेत भारतीय बनावटीचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेला आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसू लागल्याने दरातही वाढ झालेली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्यामुळे या वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे.
मखर मटेरियलही महागले
मखर मटेरियलच्या दरात वाढ झाल्याने हॅण्डमखरच्या किमतीही वाढलेल्या आहेत. आकर्षक सजावट व घरगुती गणपती बसविण्यासाठी मखरचा अधिक उपयोग होतो. मुंबई, पुणे, नाशिक, इंदूर येथून मखरचे मटेरियल उपलब्ध हाेत असते. कमीत कमी साडेतीनशे तर अधिकाधिक अडीच हजारापर्यंत मखरची किंमत आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा किमतीत काही अंशी वाढ झालेली आहे.
शिथिलता आणल्याने गर्दी वाढली
गणेशोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांची बाजारपेठेत मूर्ती खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सजावटीचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदाच्या वर्षी तसा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. राज्य शासनाने निर्बंधामध्ये काही अंशी शिथिलता आणली आहे. त्यामुळे बाजारपेठा सायंकाळी उशिरापर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. आकर्षक मखरसह रोषणाई, कृत्रिम फुलांच्या माळा बाजारात दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्येक वस्तूंमध्ये काही अंशी का असेना वाढ झाली आहे. तरीही नागरिकांकडून खरेदीला पहिली पसंती दिली जात आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली होती.