लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी खान्देश कलावंत महासंघाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी दिली़गायक, वादक, नर्तक, शाहीर, लोककलावंतांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या कलेचे जतन व्हावे या उद्देशाने धुळे, जळगाव, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील कलावंतांनी एकत्र येवून या महासंघाची स्थापना केली आहे़ अध्यक्षपदाची धुरा पारिजात चव्हाण यांच्याकडे आहे तर जळगावचे सतिष बोरसे यांना कार्याध्यक्षपद मिळाले आहे़ हेमंत सपकाळे यांची सचिवपदी नियुक्ती झाली आहे़ अॅड़ जितेंद्र निळे कायदेशिर सल्लागार असतील़ खान्देश ही कलावंतांची भूमी आहे़ कलावंतांची खाण अशी या भूमीची ओळख आहे़ ज्या कलावंतांमुळे खान्देशची वेगळी ओळख निर्माण झाली तेच कलावंत आज दुर्लक्षीत असून उपेक्षीत जीवन जगत आहेत़ काही कलावंतांचा चरितार्थ तर त्यांच्या कलेवरच अवलंबून आहे़ अशा उपेक्षीत कलावंतांना संघठीत करणे गरजेचे होते़ कलावंतांचे हक्क, समस्या, आरोग्य, विमा, वृध्दापकाळातील तरतूदी आदी गंभीर प्रश्न शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी खान्देश कलावंत महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल़ खान्देश कलावंत महासंघामध्ये धर्मेंद्र बोरसे (नंदुरबार), प्रतिभा मराठे (चोपडा), प्रकाश लोंढवे (भुसावळ), रवि निकम (चाळीसगाव), विरेंद्र सैंदाणे (धुळे), गौरव काळगे (चाळीसगाव), प्रवीण शर्मा (शिरपूर), युसूफ पठाण, भुषण गुरव (धुळे), निलेश मंडलीक (शहादा) आदी पदाधिकारींची निवड झाली आहे़ महासंघात सहभागी होण्यासाठी खान्देशातील इच्छूक कलावंतांनी कार्याध्यक्ष सतिष बोरसे आणि सचिव हेमंत सपकाळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़ महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ कलावंत शरद चौधरी, महेश घुगे, विश्राम बिरारी, कवी जगदिश देवपूरकर, शाहीर गंभीर बोरसे, रमेश निकम, मोहन तायडे, आप्पा नेवे, अशोक शर्मा, प्रा़ महेंद्र खेडकर, राजू भावसार, कमलाकर प्रजापती, चंद्रकांत पाटील आदींनी अभिनंदन केले आहे़
खान्देश कलावंत महासंघाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:13 IST