धुळे : तालुक्यातील चिंचखेडा गावात वीज कंपनीच्या पथकाने अचानक जाऊन छापा टाकला. एकाला विजेची चोरी करताना पकडले असून, त्याला जागेवरच ११ हजार ९५० रुपयांचे बिल देण्यात आले. शिवाय धुळे तालुका पोलीस ठाण्यात विद्युत कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला.धुळे तालुक्यातील चिंचखेडा गावात विजेची चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती मुकटी कक्षाचे शाखा अभियंता यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासोबत चिंचखेडा गावात जाऊन छापा टाकला. त्यावेळेस अनधिकृतपणे लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विजेची चोरी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीचा हा प्रकार २३ जानेवारी २०१९ पासून ८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सुरू होता. चौकशीतून आणि तपासणीतून ही बाब समोर आली. वीजचोरी पकडल्यानंतर कंपनीच्या नुकसानीची आणि तडजोडीच्या रकमेचा भरणा केलेला नाही. परिणामी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता मुकटी कक्षाचे सहायक अभियंता भूषण धनराज मांडवळ (३०) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, योगेश सुरेश मराठे (रा. चिंचखेडा, ता. धुळे) याच्या विरोधात विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.टी. सोनवणे घटनेचा तपास करीत आहेत.
चिंचखेडा गावात विजेची चोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:30 IST