तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी डॉ.गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेल्हाणेच्या सरपंच शीतल राजेंद्र राजपूत होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील दगडूसिंग परमार, धुळे येथील किशोर बोरसे उपस्थित होते.
डॉ.गिरासे पुढे म्हणाले की, खरे पाहता निसर्गातील सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांनी आपले पर्यावरण बनलेले आहे. यातील मनुष्य, प्राणी, पशुपक्षी, वनस्पती, जमीन, हवा, पाणी, जंगल या प्रत्येक घटकांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. माणूस मात्र स्वार्थासाठी निसर्ग संपदेचा अतिवापर व पर्यावरण प्रदूषित करून सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला नुकसान पोहोचवत आहे. वाढती लोकसंख्या व प्रगतीच्या नावाखाली होणारा औद्योगिक विकास, वस्ती विस्तारीकरण, रस्ते-महामार्गांची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्षतोड व जंगलतोड, यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. आजपर्यंत पृथ्वीवरील सजीवांच्या ४,५०० पेक्षा जास्त प्रजाती नष्ट झाल्या असून, सजीव सृष्टीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. पर्यावरण समृद्धीसाठी जनतेचे प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करणे, पाणी आडवा पाणी जिरवा, निसर्ग संपदेचा व पाण्याचा योग्य वापर, पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट न करणे गरजचे आहे.
सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश वाघ, मच्छिंद्र आभाळे, अशोक आहिरे, प्रवीण पाटील, रवींद्र आभाळे, पंकज पाटील, विकास चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.