आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात यावर्षी होत असलेल्या परतीच्या पावसामुळे रब्बी क्षेत्राच्या पेरण्यांना अद्याप सुरूवात होऊ शकलेली नाही. खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतर २५ नोव्हेंबरपासून पेरण्यांना सुरूवात होऊ शकेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान पावसामुळे रब्बीचे क्षेत्र दुप्पट वाढणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.यावर्षी जून महिना वगळता पावसाळ्याच्या सर्वच नक्षत्रांमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. सुरूवातीला उत्पन्नही चांगले होते. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला तरी संपूर्ण आॅक्टोबर महिना अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. कडक उन्हच पडत नसल्याने, शेतात वाफही होऊ शकली नाही. काही ठिकाणी तर पिकांपेक्षा तणच अधिक वाढलेले आहे.जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मुख्यत: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका, रब्बी सूर्यफूल य यांचे पिक घेतले जात असते. या पिकांची पेरणी प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने, शेतात ओलावा कायम आहे. अजून खरिपाची पीके शेतात उभी आहेत. पावसामुळे पिकांची कापणीही होऊ शकत नाही. या पिकांची कापणी झाल्यानंतरच रब्बीसाठी शेतकऱ्यांना शेताची मशागत करता येणार आहे. त्यानंतर रब्बीच्या पेरण्या सुरू होतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जोपर्यंत शेतातील पाणी पूर्णपणे आटत नाही, तोपर्यंत शेतीची कामे करता येणे शक्यच नाही.जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या होण्याला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उगविण्याची शक्यता आहे. या पेरण्या किमान डिसेंबर अखेरपर्यंत होवू शकतील. पावसामुळे यावर्षी रब्बीच्या पेरण्यांना किमान तीन आठवड्यांचा उशिर झालेला आहे.बियाण्यांची उपलब्धतायावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढण्याचे गृहीत धरून कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले असून, बियाणे उपलब्ध झालेले आहे. तसेच खतेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आता फक्त पावसाने उघडीप घेण्याची प्रतीक्षा केली जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान खरीपात अेपक्षित उत्पन्न हाती न आल्याने, अनेक शेतकऱ्यांकडे रब्बीच्या लागवडीसाठी पैसा नाही. त्यामुळे अशा शेतकºयांना कर्ज काढूनच रब्बीची पेरणी करावी लागणार आहे.
धुळे जिल्ह्यात पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:00 IST