लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद जगन देवरे यांची जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनसह तत्सम अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली़
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभियांत्रिकीअंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. यात इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन आणि इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्षपदी या स्वायत्त महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे यांची निवड झाली आहे. डॉ. देवरे यांनी या पूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून यशस्वीरीत्या काम केले. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता तसेच अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. देवरे हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच बाटू विद्यापीठात पीएच.डी.साठी मार्गदर्शक असून, आतापर्यंत सहा प्राध्यापकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे व चार विद्यार्थी संशोधनकार्य करीत आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील विविध विषयांवर ११ पुस्तके प्रकाशित झालेली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये ५५ तर राष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये ६ शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत. जानेवारी २०२० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)तर्फे इंजिनिअरिंग अचिव्हमेंट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. देवरे यांच्या नियुक्तीबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, स्वायत्त महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. विजय पाटील, डॉ. सतीश देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिल्केश जैन, कुलसचिव डॉ. प्रशांत महाजन यांनी अभिनंदन केले़
फोटो- मेलवर/फाईल पाहणे