अपघात होत असल्याने बहुतांश वाहनधारक हे प्रशासनाच्या नावाने नाके मुरडताना दिसून येतात. वारंवार रस्ता खराब होणे आणि त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची उधळण करणे कधी थांबेल, हा अनुत्तरित असा प्रश्न आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने त्यात रस्ते खराब होण्याच्या प्रमाणात घट न होता वाढच होत असल्याचे दिसून येत आहे़ मागील आठवड्यात भर पावसात रस्त्याची दुरुस्ती सुरू होती. मुळात पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला तात्पुरता ब्रेक दिला जातो. पण, धुळ्यातील परिस्थिती मुळातच वेगळी आहे़ बहुतांश रस्त्याची अवस्था वाईट आहे़
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली.
- महानगरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे़ वारंवार त्याच त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते आणि पावसाळा आला की रस्त्यांची पूर्ण वाट लागते. कोणताही एक रस्ता शहरात सुस्थितीत राहिलेला नाही़
गणेश शिंदे, वाहनचालक
- रस्त्याची दुरुस्ती होते; पण ती चिरकाल टिकत नाही. दरवर्षी दुरुस्तीचे काम प्रशासनाच्या माध्यमातून करताना दिसून येते. रोड टॅक्स भरूनसुद्धा रस्त्याच्या बाबतीत काहीही फरक पडलेला नाही़ रस्ते कधी दुरुस्त होतील, हा प्रश्न आहे़
वाल्मीक कोठावदे, वाहन चालक
खड्ड्यांमुळे मणक्याचा त्रास
- रस्त्यावरून वाहन चालविताना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ वारंवार वाहन खड्ड्यातून चालविल्यास वाहनाचे नुकसान होते शिवाय आपल्या मणक्याला मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. हा त्रास सुरुवातीला कमी वाटत असला तरी भविष्यात त्याचा त्रास होऊन शस्त्रक्रियादेखील करण्याची वेळ येऊ शकते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- शहरातील रस्त्यांची डागडुजी ही दरवर्षी विशिष्ट कालावधीनंतर केली जात असते़ त्यासाठी निधीची तरतूददेखील वार्षिक अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली जाते. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे कसे होईल याकडे बारकाईने लक्ष दिले जाते, असे महापालिकेच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे़
जेल रोड
- शहरातील जेल रोडची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. ते संपूर्ण काढण्यात आले. रस्ते दुरुस्त करण्यात आले. पुन्हा त्या रस्त्याची दुरवस्था होऊ लागली आहे.
जमनागिरी रोड
शहरातील फाशी पुलपासून हा रस्ता जमनागिरीपर्यंत जातो. सुरुवातीला या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. कालांतराने रुंदीकरण झाले. गटारी करण्यात आल्या. तरीदेखील रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थै’ आहे.