जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार धुळे जिल्ह्याला केवळ १२० इंजेक्शन मिळाले. धुळे शहरातील श्रीगणेशा हाॅस्पिटल आणि अपूर्वा हाॅस्पिटल या दोन रुग्णालयांनी प्रत्येकी ६० इंजेक्शनची थेट खरेदी केल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनातर्फे शनिवारी इंजेक्शनचे वाटप झाले नाही. धुळे शहर वगळता जिल्ह्यात कोणत्याही रुग्णालयाला इंजेक्शनचा पुरवठा झाला नाही.
शहरासह जिल्ह्यात कोविड रुग्णालयांमध्ये १ हजार २८५ ऑक्सिजन बेड आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडिसिविर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सर्वच रुग्णांना इंजेक्शनचा वापर करू नये अशा सूचना असताना खासगी रुग्णालयात अजुनही रेमडिसिविरचा सर्रास वापर सुरू आहे. गरज नसलेल्या रुग्णांनादेखील सहा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करण्याचा आग्रह धरला जात आहे. डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतर नातलगांनी इंजेक्शन कोठूनही आणा, असे बजावण्यात येत असल्यामुळे नागरिकांची दररोज रेमडिसिविरच्या शोधासाठी भटकंती सुरू येत आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ४०० ने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत उपलब्ध होणारा रेमडेसिविरचा साठा कमी पडत आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे काही अंशी का असेना दिलासा आहे.
तातडीची गरज म्हणून राखीव
जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीकडे इंजेक्शनचा काही साठा राखून ठेवला जातो. जिल्ह्यात एखाद्या गंभीर रुग्णाला तातडीने इंजेक्शनची गरज असेल आणि मिळत नसेल तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने समितीमार्फत इंजेक्शन उपलब्ध केले जाते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा रेमडेसिविर पथकाच्या प्रमुख मधुमती सरदेसाई यांनी लोकमतला दिली.