दहा वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने म्हाडाअंतर्गत मोहाडी उपनगरासह विविध भागात घरकुले बांधण्यात आली. आतापर्यंत १८०० ते २००० घरे बांधून तयार असून केवळ मनपातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच ही घरे लाभार्थ्यांना मिळालेली नाहीत. तसेच दुसरीकडे ही तयार घरे परस्पर विकण्याचा प्रकारही घडत आहे, अशा तक्रारीही मनपाला प्राप्त झाल्या आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन व आंदोलने करूनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. मोहाडी परिसरातील तयार घरकुलांसह अन्य भागातील घरकुलांचा लाभ नियमानुसार लाभार्थ्यांना द्यावा, तसेच घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. अन्यथा मनपा प्रशासनाविरुध्द उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करू, अशा इशारा निवेदनाद्वारे नगरसेवक राजेश पवार यांनी दिला आहे.
निवेदनावर नगरसेविका सुरेखा देवरे, सारिका अग्रवाल, नगरसेवक दगडू बागुल, बंटी मासुळे, भगवान गवळी, नरेश चौधरी, प्रवीण पवार यांचीही नावे आहेत.