धुळे : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांसह पथकाशी वाद घालत शासकीय कामांत अडथळा आणल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता विपुल प्रकाश भामरे (३४, रा. साक्री रोड, धुळे) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भामरे बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह देवपूरमधील नेहरु चौकातील साहील ग्लास या दुकानात वीजबिल वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी दुकानदार साहीलनबी बाबूखान (४०) आणि अलीहसन अलीनबी (२१) यांनी वीजबिल भरण्यास नकार दिला. तसेच तुम्ही आमच्या दुकानाचा वीज पुरवठा कसा खंडित करता तेच पाहतो, असे म्हणत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केला. परिणामी त्यांनी शासकीय कामांत अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल इशी घटनेचा तपास करीत आहेत.