धुळे : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १ हजार १३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या माध्यमातून ८ कोटी ३३ लाख ८९ हजार ५८० रुपयांची नुकसान भरपाई व वसुली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. डी. यू. डोंगरे यांनी दिली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशाने जिल्ह्यात १२ डिसेंबर रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित ९१२ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतची प्रकरणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे वादपूर्व ९ हजार ९५७ प्रकरणे ज्यामध्ये ज्यामध्ये बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणे २३१ आणि दाखलपूर्व ९०२ प्रकरणे असे एकूण १ हजार १३३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीच्या माध्यमातून ८ कोटी ३३ लाख ८९ हजार ५८० रुपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली आहे.मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत पार पडली. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ?ड. अमोर सावंत, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ?ड. दिलीप पाटील यांच्यासह वकील उपस्थित होते.
लोकअदालतीत १ हजार १३३ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:08 IST