धुळे : कोरोनाची लाट ओसरताच जळगाव विभागाने गुजरात राज्यासाठी बससेवा सुरू केली असतानाही धुळे विभागातून गुजरातसाठी बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. अखेर प्रवाशांच्या मागणीमुळे धुळे आगारातून सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती धुळ्याच्या आगारप्रमुख स्वाती पाटील यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने बससेवा सुरू झाली आहे. एसटी महामंडळ व गुजरात राज्य मार्ग वाहन व्यवहार निगममध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सामंजस्य करार झाला. त्यानुसार आंतरराज्य प्रवासी वाहतूक सुरू झाली. एसटी महामंडळाच्या जळगाव आणि नगर विभागातील बस गुजरात राज्यातील सुरत आणि वापी शहरांपर्यंत जात होत्या. पण धुळे विभागातील नऊ आगारांतून एकही बस गुजरातमध्ये जात नव्हती. विभागातील एकूण नऊ आगारातून सुरत, अहमदाबाद, बडोदा, वापी, नवसारी आदी शहरांमध्ये रोज २० ते २५ बसेस जातात. त्यामुळे महामंडळाला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात. पण बससेवा बंद असल्याने उत्पन्न थांबले हाेतेे. दरम्यान प्रवाशांची मागणी वाढल्याने, धुळे आगारातून आता सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. सध्या दररोज ४ ते ५ बसेस सुरतसाठी सोडण्यात येत आहेत.
मध्य प्रदेशसाठी अद्याप बससेवा बंदच
धुळे विभागातून तसेच इंदूर,सेंधवा, खंडवा, बऱ्हाणपूर आदी शहरासाठी बससेवा सुरू होती. मध्य प्रदेश आगाराच्या अनेक बसेस धुळे, शिर्डीसाठी धावत होत्या. मात्र गेल्या मार्च महिन्यापासून मध्य प्रदेशची बससेवा बंदच आहे. मध्य प्रदेश परिवहनच्या बसेस महाराष्ट्रात येत नाही, तसेच महाराष्ट्राच्या बसेसही मध्य प्रदेशात जात नाही. यामुळे कोट्यवधीचे नुकसान होत असून, मध्य प्रदेशची बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.