पक्षीय बलाबल पाहता, महापौर पदावर भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड होणार असे दिसते. मात्र भाजपमधील नगरसेवकांमध्ये महापौर निवडीवरून असलेल्या नाराजीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांच्यातील काही नेते तर उलटफेर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे दमन येथे मुक्कामी असलेले नगरसेवक गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी सरळ सभेला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.
पाच जणांचे अर्ज
सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपाकडून नगरसेवक प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून मदिना समशेर पिंजारी, शिवसेनेतर्फे ज्योत्स्ना पाटील, तर एमआयएमच्या सईदा इकबा अन्सारी यांचा आणि अपक्ष म्हणून नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांचा अर्ज दाखल आहे.
सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. छाननीनंतर उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. माघारीनंतर मतदानाला सुरुवात होणार आहे.
भाजपातील काही नगरसेवकांची नाराजी
भाजपात महापौर पदावरून काही नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. काहींनी ती उघडपणे व्यक्तही केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे सर्व नगरसेवक हे दमण येथे एका रिसोर्टमध्ये मुक्कामी आहेत. त्याठिकाणीसुद्धा नगरसेवकांमध्ये दोनदा वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मतदानाच्या वेळी जर ही नाराजी उमटली, तर महापौर पदाच्या निवडीत चुरस निर्माण होऊ शकते. पण नाराज नगरसेवकांची संख्या ही कमी असल्याने भाजपाचे नेते कर्पेंची निवड महापौरपदी निश्चित असल्याचे सांगत आहेत.
महाविकास आघाडीचे प्रयत्न
महापौर पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल असले तरी, माघारीच्या वेळेस शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्ना पाटील यांच्या समर्थनात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार यांनी माघार घेतली असे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतर्फे भाजपातील नाराज नगरसेवकांच्या गटाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीला भाजपाच्या १५ नगरसेवकांच्या गटाच्या पाठिंब्याची गरज आहे. तसे झाले तरच आघाडी महापाैर पदासाठी आवश्यक मॅजिक फिगरपर्यंत पोहोचू शकेल. एकूणच महाविकास आघाडीला ही फिगर गाठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीत कागदावर आज तरी भाजपाचे पारडे जड आहे.