आॅनलाइन लोकमतधुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या काही दिवसांपासून सावरकर पुतळ्याजवळील काजवे पुलावरून वाहतूक बंद आहे. शिरपूर, शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसेस गावाबाहेरून जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळा भरण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी देवपूर बसस्थानकातून बस सोडून विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसतर्फे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात. मात्र पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे काजवे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरपूर, शिंदखेडाकडे जाणाºया बसेस नगाव चौफुलीमार्गेच मार्गस्थ होत असतात. बस गावात येत नसल्याने, विद्यार्थ्यांना चौफुलीवरच उतरविण्यात येते. तेथून विद्यार्थ्यांना ३-४ किलोमीटरपर्यंत पायपीट करून शाळा, महाविद्यालयात यावे लागते. पूलावरून वाहतूक केव्हा सुरू होईल हे अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे एकतर पर्यायी मार्गाने बस सुरू करावी, किंवा शाळा, महाविद्यालय सुरू होण्याच्यावेळे दरम्यान देवपूर बसस्थानकापर्यंत बस सोडण्यात यावी तेथून बस पुढे मार्गस्थ करावी अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांजवळ पासेस असूनही त्यांच्याकडून १० रूपये आकारले जातात. ते आकारण्यात येवू नये. तसेच देवपूर बसस्थानकातून बस सोडून विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, विश्वजीत पाटील, पियुष पवार, बंटी निकम भूषण चौधरी, मिलिंद खैरनार, वसंत पाटील, ललित सैदांणे,आदेश माळी, कुणाल पाटील, अनिकेत माईनकर, बंटी विभूते उपस्थित होते.
धुळे आगाराने विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:28 IST