धुळे : सोनगीरकडून धुळ्याच्या दिशेने येणारी संशयित कार देवपूर पोलिसांनी सापळा रचून पकडली. त्यात १० किलो गांजा आढळून आल्याने ३ लाख १६ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी झाली असून सायंकाळी गुन्हा दाखल झाला.सोनगीरकडून धुळ्याच्या दिशेने येणारी एमएच- १८ एसी- ०१७३ क्रमांकाच्या कारमध्ये गांजा असल्याची गोपनीय माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावण्यात आला. माहिती मिळालेली कार येताच ती थांबविण्यात आली. सुरुवातीला चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने संशय अधिकच बळावला. कार बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला १० किलो वजनाचा गांजा आढळून आला. तात्काळ तो जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. कारसह दोघांना देवपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद नोंदविण्यात आली.याप्रकरणी प्रीतेश ईश्वर गुजर (२६ , रा. गल्ली नंबर ५, धुळे) आणि मनोज गोरख चौधरी (३२, रा. वाखारकरनगर, नाटेश्वर कॉलनी, धुळे) या दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक लोेकेश पवार, कर्मचारी जब्बार शेख, संदीप अहिरे, शशिकांत देवरे, विनोद अखडमल, किरण साळवे, सागर सूर्यवंशी, कैलास ढोले यांनी कारवाई केली. दरम्यान, गांजा कोठून आणला आणि कुठे नेला जात होता याची चौकशी सुरु आहे़
सापळा रचून देवपूर पोलिसांनी पकडला १० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 21:40 IST