थाळनेर (वार्ताहर) : थाळनेरसह परिसरातील गावांमधील ऊस पिकावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच कृषी विभागाने थाळनेर परिसरातील ऊस पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ऊस या पिकावर लोकरी मावा व पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘ऊस या पिकावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील ऊस या पिकाची पाहणी केली. यावेळी ऊस पिकावर पांढरी माशी व पायरीला या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला असून, पांढरी माशी व पायरीला किडींच्या नियंत्रणासाठी सुयोग्य मशागत व जैवीक किड नियंत्रण या उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.
उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, जेणेकरून पीक संरक्षण उपाय योजना करणे सोयीस्कर होईल. पांढरी माशी तसेच पायरीला ही रस शोषणारी कीड पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन पाने पिवळी पडून उत्पादनात घट येते. यासाठी खतांच्या मात्रा शिफारशीनुसार द्याव्यात, असे तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ ,कृषी अधिकारी योगेश सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण चौधरी, किशोर पगारे, रोहिणी वळवी यांनी सांगितले.