आठ ते दहा दिवसांत पीक कर्जाबाबत प्रगती दिसली नाही. तर शिवसेना पदाधिकारी तसेच शेतकरी बँकेला कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेसमोर उपोषणास बसतील असा इशारा शिवसेनेच्या धुळे ग्रामीण तालुका महिला संघटिका कोमल वाघ, शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील भागवत, शिवसेना नेर विभाग प्रमुख रवींद्र वाघ, उपविभाग प्रमुख शिरधाणे गण कृष्णा खताळ, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी, ईश्वर खलाणे, देवीदास माळी, मधुकर माळी, प्रकाश जाधव, सुभाष माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. थोड्या दिवसांवर रबी हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत फार अडचणी निर्माण होणार आहेत. खरीप हंगामातील कर्जाबाबत शेतकऱ्यांकडून संपूर्ण कागदांचा पाठपुरावा केला जात आहे. अद्याप पीक कर्ज मिळत नाही. पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या रबी हंगामात शेतकऱ्यांना कागदांसाठी हेलपाटे होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी शाखाधिकारी जगदाळे यांना निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
प्रतिक्रिया - रवींद्र जगदाळे
शाखाधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नेर गावासह परिसरातील खंडलाय, शिरधाणे, नवे भदाणे, जुने भदाणे गावांतील खातेदार जास्त असल्यामुळे तसेच बँकेतील कर्मचारी संख्या कमी असल्याने काम करण्यास अडथळा निर्माण होत असतो; परंतु माझ्याकडे पीक कर्जाबाबत जमा झालेल्या फाइल्समधील कागदांची लवकरात लवकर पडताळणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.