धनराज सुकलाल पाटील (५५, रा. उभंड पो. वर्धाने ता. साक्री) हे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उभंड शिवारातील कोळीचा नाल्याजवळील स्वत:च्या शेतात कांदा लागवड करीत होते. त्या दरम्यान ते इलेक्ट्रिक मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शाॅक लागला. घटना लक्षात येताच त्यांना पुतण्या संदिप धनराज पाटील याने तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. संजय चिंधू पाटील यांच्या माहितीवरुन साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत धुळे तालुक्यातील मुकटी येथील पुनम विशाल जगदाळे (३०) या महिलेला घरातील बोर्डातून काढलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. तिला तात्काळ खासगी नंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. निलेश जगदाळे यांच्या माहितीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.