कोरोनाच्या महामारीने उग्र रूप धारण केले असून असंख्य कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारासाठी अनेक रुग्णालयांत दाखल होत आहेत. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आ. काशीराम पावरा यांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी २४ तास वीज कनेक्शनची गरज आहे. तसेच शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये सुद्धा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून आ. अमरीशभाई पटेल यांनी खासगी आर्थिक योगदानातून ऑक्सिजन प्लांट सुरू केलेला आहे. तिथे देखील विजेचा पुरवठा २४ तास सुरळीत राहावा. तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देखील २४ तास विजेची गरज आहे. या तीनही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट असल्याने व तिथे नेहमीच क्रिटिकल रुग्ण दाखल होत असल्याने वीजपुरवठा सुरळीत व नियमित राहणे गरजेचे आहे. म्हणून या तीनही ठिकाणी एक्स्प्रेस फिटरमार्फतच डायरेक्ट वीज कनेक्शनची व्यवस्था करण्यात यावी. एक्स्प्रेस फिटर लाइनवर काही ठिकाणी काही ट्रान्सफॉर्मर असल्याने तांत्रिक कामाच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो. या तीनही रुग्णालयांमध्ये विजेअभावी काही रुग्णांना इजा पोहोचू शकते. जेणेकरून रुग्णांना काही नुकसान पोहोचल्यास त्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची राहील, असेही पत्रात म्हटले आहे.
सदर कामाबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, असे पत्र आ. काशीराम पावरा यांनी कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., दोंडाईचा) व उपकार्यकारी अभियंता यांना पाठविले आहे़