नेर : दोन ते तीन दिवसांपूर्वी नेर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भदाणे शिवारातील गण्यादेव येथे गणेश मोतीराम खलाणे यांची पन्नास फूट चाळ नवीन तयार केलेली होती. शेतातील कांदा दिवसभर त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मजूर लावून कांदा चाळ असलेल्या ठिकाणी वाहतूक केला होता. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत मोठा खर्च लागल्यामुळे सध्या कांद्याला खर्चापेखा कमी भाव असल्याने कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. थोड्या दिवसात कांद्याचा भाव वाढेल, या अपेक्षेने शेतकरी गणेश खलाणे यांनी या कांद्याची साठवणूक केली होती. परंतु त्याचदिवशी सायंकाळी झालेल्या वादळामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.
जोराचा वादळी वारा असल्यामुळे नवीन बांधलेल्या कांदा चाळीवरील ताडपत्री तसेच चाळीला बसवलेले लोखंडी अँगल, जाळी हे सर्व मोठ्या वादळामुळे उडून गेल्याने चाळीत भरलेला कांदा संपूर्ण बाहेर फेकला गेला. या नुकसानाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.