महावितरणचे शेती पंप सोडून दोंडाईचा उपविभागात २२ हजार ५८२, शिंदखेडा उपविभागात २० हजार ५५३, शिरपूर उपविभाग १ यात ३८ हजार ५४२, शिरपूर उपविभाग २ यात २६ हजार ८९६ असे एकूण १ लाख ८ हजार ७५ वीज ग्राहक आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून, संचारबंदी लागू आहे. कोरोना आटोक्यात यावा म्हणून कोविड-१९ चे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग बऱ्याच कॉलनीत, वसाहतीत किंवा घरात झाला आहे. कोरोनाबाधित घरातील व्यक्ती किंवा कोरोनाबाधित मीटर रीडिंग घेणारी व्यक्ती यामुळेही कोरोना बाधा वाढू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वीज मंडळाच्या महावितरण विभागाने मीटर रीडिंग घेण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. वीज ग्राहकाने स्वतःच मीटर रीडिंग घेणेसाठी महावितरणने मोबाईल अॅप व वेबसाईट सुरू केली आहे. आता कोरोनाच्या काळात मोबाईल एसएमएस मार्फत मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही, अशा ग्राहकांना एसएमएस मार्फत मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपावेतो एका निश्चित तारखेला मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. रीडिंगसाठी निश्चित तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद केली आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून एसएमएस मार्फत रीडिंग पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांनी स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे किंवा एसएमएस मार्फत मीटर रीडिंग पाठवावे. परंतु, एसएमएस मार्फत स्वत: मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. ग्राहक क्रमांक पुढे असलेले मीटर रीडिंग टाईप करून महावितरणच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही .
कोरोनाच्या काळात वीज मीटर रीडिंग वेळेत घेतले गेले नाही तर स्लॅब वाढून ग्राहकाचे बिल जास्त येणार असून, वीज मंडळाची थकबाकी पण वाढणार आहे. रीडिंग पाठविल्याने ग्राहकास वीज वापर पण कळणार आहे. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास लगेच तक्रार करता येईल. मीटर रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जोशी यांनी केलेे आहे.