धुळे :दरवर्षी जून महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी कोरोनामुळे तब्बल दीड महिना लांबणीवर पडल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांना बदलीची उत्सुकता लागली असून, येत्या दोन दिवसात बदली प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी जिल्हांतर्गत बदल्या होणार आहे. बदलीसाठी अनेक शिक्षकांनी तालुकास्तरावर अर्ज केले असून, ते शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत. बदल्यांची फाईल सीईओकडे असून त्यावर गुरूवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी फक्त विनंती बदल्या करण्याची सूचना प्रशासनाने दिलेली आहे.जिल्हंतर्गत जवळपास १५० तर आंतरजिल्ह्याच्या जवळपास ३६ बदल्या होऊ शकणार आहे. आता कोणाकोणच्या बदल्या होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.दरम्यान गेल्यावर्षी जिल्ह्यातील तब्बल ३५० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. त्यामानाने यावर्षी बदलीपात्र शिक्षकांची संख्या खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षकांना बदल्यांची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:40 IST