तालुक्यातील पश्चिम भागातील सुराय, कर्ले, परसोळे, कलवाडे, अक्कलकोस, चुडाणे आदी गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. प्रथमच या ग्रामपंचायतींच्या राजकीय वातावरणात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.
सुराय ग्रुप ग्रामपंचायतीसाठी २३ उमेदवार रणांगणात होते. यासाठी पाच बुथ सुराय जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर एक बुथ अक्कलकोस येथे होता. मतदार यादीत एकूण तीन हजार ६५४ मतदार असून, पैकी दोन हजार ५०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
कर्ले ग्रामपंचायतीतही अकरा जागा असून, चार वार्डातून स्वतंत्र चार बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. येथे २२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. एकूण दोन हजार ७७९ मतदारांपैकी दोन हजार ९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येथे बजावला. येथे ७३.२७ टक्के मतदानाची नोंद झाली.
परसोळे ही शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवरील शेवटची व सर्वात लहान ग्रामपंचायत असून, येथे सात जागा आहेत. यासाठी १४ उमेदवार रणांगणात होते. येथे ८७.१० टक्के मतदान झाले.
मतदानानंतर गावात उलटसुलट चर्चाना ऊत आला असून, सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. उत्साह शिगेला पोहोचला असून, कोणाच्या अंगावर गुलाल पडते तर कुणाला पराभवाचे तोंड पाहावे लागते, हे आज निकालावरून स्पष्ट होणार आहे. यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या गावांमधे उत्साह शिगेला पोहोचला आहे.