मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असुन आठवड्यातुन तीन दिवस येथे लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.कोरोना विषाणू विरोधी लसीकरण मोहीम अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त आहे व ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील व्यक्ती ज्यांना मधुमेह, हृदय, किडनी व लिव्हरचे दुर्धर आजार आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कोरोनाचे लसीकरणं देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे करण्यात आला.त्यानुसार गावातील आशा स्वयंसेविका यांचेमार्फत घरोघरी जाऊन ४५ ते ५९ वर्षातील व्यक्ती जे कोमोरबीड आहेत व ६० वर्षावरील व्यक्ती यांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन कोविन पोर्टल वर करण्यात येऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.पात्र व्यक्तींनी कोविन अॅप, आरोग्य सेतू अॅप किंवा वेब साईटवर जावून लॉगीन करून तसेच ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या संकेतस्थळवर जाऊन आपले नाव नोंदवावे असे आवाहन मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ हितेंद्र पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातून ३ दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ ह्या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 22:21 IST