मालमत्ता कराच्या थकबाकीच्या प्रश्नांवर बुधवारी आयुक्त अजीज शेख यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला न्यायमूर्ती डाेंगरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवक देखील उपस्थित होते. वारंवार शास्तीमाफी हा मालमत्ता कर संकलनाचा मार्ग होऊ शकत नाही. नागरिकांनी वेळेवरच मालमत्ता कर भरावा, अशी अपेक्षा न्यायमूर्ती डोंगरे, आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केली.
मालमत्ता कर का भरला जात नाही, या विषयावर नगरसेवक संजय पाटील म्हणाले, आपण जनतेला मूलभूत सुविधा देत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे. त्यातूनच जनता मालमत्ता कर भरत नाही. तर नगरसेवक शितल नवले यांच्यासह अन्य नगरसेवकांनी ५० टक्के व २० टक्के शास्ती माफी न देता शंभर टक्के शास्ती माफी देऊन टाकावी अशी मागणी केली. याशिवाय काही पर्याय देखील सुचविण्यात आले.
या बैठकीला स्थायी समिती सभापती संजय जाधव, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, महिला सभापती वंदना थोरात, वसीम बारी, प्रतिभा चौधरी, साबीर शेख, उमेर अन्सारी, विजय जाधव, अमीर पठाण, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.