धुळे : शहरात प्रभाग समित्या गठित व्हाव्यात व जनतेच्या समस्या महानगर पालिकेपर्यंत पोहोचाव्या यासाठी नगर राज बिल समर्थन मोर्चाकडून संपर्क अभियान राबविले जात आहे. पत्रक प्रसिद्ध करून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, प्रभाग समित्या गठित व्हाव्यात व नगर राज कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, नगरराज बिल समर्थन मंच धुळे व सदभावना संघ मुंबई गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे करत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन बैठका घेतल्या जात होत्या. आता यापुढे शहरातील सर्व प्रभागांत समित्या गठित करून नगरराज बिलाची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ज्याप्रमाणे गावांमध्ये ग्रामसभा होऊन गावाच्या विकासावर चर्चा केली जाते त्याप्रमाणे प्रभाग सभा घेण्याबाबत कायद्यात सांगितले आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मुंबई सदभावना संघाचे संयोजक वर्षा विद्या विलास, प्रभा तिरमारे, विधी अध्ययन व संशोधन केंद्राचे अविनाश पाटील आदी मान्यवर धुळे दौऱ्यावर येणार असून, प्रत्येक प्रभागात संपर्क प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, रामदास जगताप, नवल ठाकरे, चंद्रवीर सावळे यांनी केले आहे.